माझे स्नेही के. राम गणेश गडकरी यांच्या काव्यग्रंथाची प्रस्तावना मी लिहावी अशी विनंति मला करण्यांत आली व ती मी स्वीकारली; याचे कारण मी स्वतःला काव्यविषयांतील मर्मज्ञ समजतों असें नव्हे, तर त्यायोगाने माझे स्नेहऋण अंशतः तरी फेडण्यास मला संधि मिळेल, या भावनेनें. रा. गडकरी यांच्या व माझ्या वयांत बरेंच अंतर असून त्यांचा माझा प्रथम परिचय बराच उशीरां झाला. तथापि स्नेही या नात्यानें त्यांचे माझे जे थोडे दिवस गेले त्यांत त्यांच्याशी संभाषण हा एक, क्वचित् मधून मधून मिळणारा पण मिळेल तेव्हां उत्कट आनंद देणारा, असा विषय होऊन बसला होता. कारण त्यांच्या भाषणांत त्यांचे लेख व कविता या दोहोंतील गुण एकत्रित झालेले होते. कोटिबाजपणा व विनोद यांचा चमचमीत मसाला त्यांच्या भाषणांत भरलेला असल्यामुळे तें बुद्धिजिव्हेला पक्वान्नासारखे अवीट वाटे. आणि हास्यरसाचा पूर भरविणारे असल्यामुळे तें भाषण एक प्रकारचें विश्रांतिस्थानच होऊन बसत असे. त्यांच्या भाषणाच्या विनोदीपणामुळें रंगलेली सभा किंवा रंगलेले नाटक चाललें असतां त्यांच्या शेजारी बसणें हें जितकें दुर्घट काम वाटे तितकेंच निर्मक्षिक स्थितींत त्यांच्याशी संभाषण करणें याविषयी मन मोठे उत्सुक असे. कारण गडक-यांच्या कल्पनेचा अनिरुद्ध संचार या संभाषणांतून खरा पाहावयास मिळे. चमत्कृतिजनक व विकृत अशाहि कल्पना लोकांना ऐकविण्याच्या कामी गडक-यांइतका धाडसी व बिनमुर्वतखोर लेखक मराठी भाषेत आजपर्यंत झाला नाहीं असें मला वाटतें. पण गडकन्यांना देखील शाई व कागद या सासूसासऱ्यांची मर्यादा लेखन- संसारांत जी मोडता येत नसे ती मोडण्याला भाषणांत वाव मिळत असे. खुल्या दिलानें बोलणाऱ्या स्नेह्यांचा नैसर्गिक संकेतच असा असतो कीं जें बोललें तें त्यानंतर विसरून जावे. पण मनोगांभीर्याच्या चाळणीतून विसरून जाण्यासारखे वाणीचे कण गाळून टाकले तरी, निरंतर स्मरणांत जपून ठेवण्यासारखें किंबहुना एखाद्या स्मरणाच्या स्फटिक मण्याप्रमाणें वारंवार घोळले तर सुख व शीतलता देणारे असे विचार त्या संभाषणांतून किती तरी मजजवळ अवशिष्ट राहिलेले आहेत. निःस्वार्थबुद्धीनें गडकरी जें हें विचारॠण मला देऊन गेले त्याची फेड या प्रस्तावनेनें मी अंशतः करीत आहे असें मला वाटते.
मी स्वतः जरी मध्यमवयीन आहे तरी गडकरी यांचे चरित्र सर्व माझ्या डोळ्यांपुढे होऊन गेलेंहि. कॉलेजांतील विद्यार्थी, नाट्यकलेचा नादी, मासिकांतून झळकणारा विनोदी लेखक, कवि व नाटककार हीं त्यांच्या चरित्रांतील पांच स्थित्यंतरें इतक्या त्वरेनें एकामागून एक निघून गेलीं कशीं व आपल्या वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी मराठी भाषेतील एक चांगले कवि व नाटककार अशी कीर्ति प्रस्थापून ते गेले कसे याचा अचंबाच वाटतो. पण विचार करूं गेलो असतां ही गोष्ट एका प्रसिद्ध नियमाला अपवादभूत नसून उलट पोषक अशीच ठरते. हा नियम असा कीं, खरी काव्यस्फूर्ति किंवा नाट्यस्फूर्ति मनुष्याला अल्पवयांतच होते. गडकरी आणखी जगते तर ते आणखी लिहिते हॅ खरें; तथापि कवि व नाटककार या नात्यानें त्यांची स्फूर्ति त्यांच्या पूर्व- वयांत जितकी चमकली तितकी ती उत्तर वयांत चमकली असती किंवा नाहीं हें सांगणे कठीण आहे. गुंजारव करणारा भोवरा हा स्वतःला आपल्या जोरदार प्रथम परिभ्रमणांनीं भूमीमध्ये व तेंहि मर्यादित कक्षेत गाडून घेतो. तीच गोष्ट मनुष्याची बुद्धिमत्ता किंवा प्रतिभा यांचीहि होते. कवि व नाटककार यांची प्रतिभाहि कालांतराने एकमार्गी बनते व त्यांच्या हातून उत्तरोत्तर निर्माण होणारी काव्यें किंवा नाटके यांतील नावीन्य नष्ट होऊन स्फूर्तिहि घड्याळांतील कमानीप्रमाणें शिथिल होते, जगांतील मोठमोठे कवि व नाटककार यांच्या सर्वोत्कृष्ट कृति अशाच अल्प वयांत अवतरल्या, हें त्यांची चरित्रे या दृष्टीनें वाचून पाहणाराला बिनतक्रार कबूल करावें लागेल. किंबहुना वृद्ध कवि किंवा म्हातारा नाटककार हे शब्द वदतोव्याघाताची उदाहरणें म्हणून कोणीही खुशाल द्यावा. मानसशास्त्रदृष्ट्या या चमत्काराचे कारण प्रायः हेंच असावें कीं, प्रतिभा हें शरीरपरिणतीबरोबर उत्पन्न होणारें तेज असल्यामुळे तें उत्पत्तीबरोबरच आपला प्रभाव दाखवूं लागतें व त्यावर आधिभौतिक, आध्यात्मिक, संकटमय स्थितीचीं एकावर एक अशी कितीहि जाड आवरणें पडली तरी
त्यांतून ते बाहेर झळकल्याशिवाय व आपले गुणकार्य केल्याशिवाय राहू शकत नाही. यामुळेच दारिद्रय, दुःख, दास्य, सेवावृत्ति, कारागृहवास अशा संकटावस्थेंतच प्रथम लोकनिदर्शनास आलेले आणि पुढें प्रतिभासामर्थ्यावर स्वातंत्र्य व ऐश्वर्य मिळविलेले किती तरी कवि, नाटककार व लेखक सरस्वतीच्या मंदिरात अढळस्थानापन होऊन राहिले आहेत.
रा. गडकरी यांची हल्लीं प्रसिद्ध झालेली ही कविता इतर कित्येक कवींच्या मानाने कमी भरेल; तथापि खऱ्या प्रतिभेची कसोटी लावून जर आपण तुलना करू लागलो तर त्यांच्या कवितासंग्रहाचे मूल्य अशांपैकी काहींहून अधिक भरते असे म्हणता येईल. नाटकांच्या बाबतीत त्यांनी जशी रा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांकडून मूळ स्फूर्ति मिळविली, तशीच काव्यांच्या बाबतीत त्यांची स्फूर्ति केशवसुतांपासून मिळाली आहे हे उघड दिसते. प्रस्तुत पृष्ठ ७७ वर खालील स्पष्ट उलेख आहे.
‘कुणी मनाचा असेल कच्चा
काल त्यालाही मनशुर
या गाण्याचे गाउनि सूर
केशवपुत्राचा महशूर
गोविंदाग्रज चेला सच्चा
पृष्ठ १२८ वर या ‘सच्च्या चेल्याने’ ने आपला नम्र भाव खालील ओळीत व्यक्त केला आहे:
“शिवरायाच्या मागे आम्ही लाल महाली फिरणें
तसेच तुमच्या मागे आम्ही नवीन कविता करणें
असेच कांहीं कांही करुनी जीवित त्याला गणणें
गोविंदाग्रज म्हणे असे हॅ आम्हां लाजिरवाणें”
पृष्ठ ३९ वर कवीनें महाराष्ट्रजनतेला, केशवसुत मेले नाहीत, ते फक्त गाउनि गेले, किंवा ते मेले असें मानलें तरी
“निघतील तयाचे चेले
केशवसुत कसले मेले । केशवसुत गातचि बसले “
असे भविष्यात्मक आश्वासन देऊन ठेविलें आहे. रा. कोल्हटकर यांच्या बद्दलचा उल्लेख ‘भावबंधन’ नाटकाच्या प्रारंभी, ‘प्रेमसंन्यासा’च्या अर्पणपत्रिकेत, तसेंच प्रस्तुत पुस्तकाच्या २०९ पृष्ठावर ‘श्रीमहाराष्ट्रगीता ‘त आहे:
“जिथें रंगलीं साधीं भोळीं जनाइचीं गाणीं
तिथेंच खेळे श्रीपादांची कलावती वाणी “
तसेच बालकवि ठोमरे हे जरी वयाने गडकऱ्यांहून लहान व त्यांना गडकऱ्यांनी केवळ गुरु असे मानलेले नव्हते, तरी त्यांच्या कवितेची छाप गडकऱ्यांवर पुष्कळ पडली होती हें स्वतः गडकरी यांनीच कबूल केलेले आहे.
पण कित्येक शिष्य थोड्याच अवधीत गुरुच्या बरोबरीने मान मिळविण्याला पात्र होतात. मग याचें श्रेय स्वतः शिष्याकडे द्या किंवा ‘आपणासारिखे करिती तात्काळ | नाही काळ वेळ तयालागीं’ या अभंगवाणीचें उदाहरण म्हणून तें गुरूकडे द्या कसेंहि म्हटलें तरी एकच. वास्तविक एकाच शिष्यानें दोन निरनिराळे गुण अंगीं असणाऱ्यां गुरुचें शिष्यत्व कारण्यासारखें हे आहे. कारण केशवसुतांच्या कवितेत मुख्य गुण म्हटले म्हणजे कल्पनेची ऋजुता, शुद्ध सौंदर्यप्रतीति व किंचित् गूढार्थप्रीती हे होत. याच्या उलट रा. कोल्हटकर यांच्या स्फूर्तीत गुण म्हटले म्हणजे वस्तुविकारदर्शनाची आवड, वक्रोक्ति, मूर्तिमंत गंभीरतेलाहि हंसविणारा विनोद हे आहेत. कोल्हटकरांच्याहि प्रतिभेच्या टांकसाळीत सुंदर कल्पनांचीं सुवर्णाचीं नाणी पाडली जातात, पण हिंदुस्थानातील टांकसाळीप्रमाणे खुद्द ‘सरकार ‘ची लहर लागेल तेव्हां! एरवी नित्य व्यवहारांतील चलनी नाणें म्हटलें म्हणजे हास्यजनक वस्तुस्थितिविपर्यास हेंच होय. गडकऱ्यांची त्यांतल्या त्यांत आवड पाहिली तर ती कोल्हटकरांच्या प्रतिभेकडेच अधिक झुकते. परंतु: व्यवहाराकरितां मार्ग एकाचे व ‘आदरार्थे’ गुरुत्व दुसऱ्याचें, असले प्रकार केवळ वाङ्मयसृष्टींतच दिसतात असें नाही. गडकऱ्यांच्या ‘वाग्वैजयंती’ तील कांही थोडे मणी केशवसुती घाटाचे असले तरी कोल्हटकरी घाटाच्या मण्यांची संख्याच एकंदरीनें अधिक भरेल असें मला वाटतें. वाचकाला वाचतांना हंसूं येईल किंवा चमत्कृति वाटेल अशी केशवसुतांची एकही कविता दाखवितां येणार नाही. उलट प्रस्तुत कवितासंग्रहांतील गडकऱ्यांची एकही कविता बहुधा अशी नाहीं, की जी वाचत असतां तोंडाची सुरकुती मोडणार नाही. विचाराच्या शुभ्र चेहऱ्याला विकाराची तीट लावल्याशिवाय त्याचें खरें सौंदर्य खुलत नाही. या मताचे गडकरी होते. xxxx
तरीहि माझ्या मते गडक-यांच्या विनोदी उच्छृंखल प्रतिभेला नाटकांतून जें स्वातंत्र्य मिळाले तें त्यांना त्यांच्या कवितांतून मिळाले नाही. याचे कारण उघडच आहे. नाटकांत एकच कल्पना अनेकरूप करण्याला संभाषण, नेपथ्य, नाट्य व मार्मिक प्रेक्षकांच्या मनांतून उठणारा अनुरणनाचा ध्वनि इतकी सामग्री मिळते. काव्याचे क्रीडांगणच मुळीं मर्यादित असतें. नाटक म्हणजे विनोदाला ती एकतर्फेची सतारच होय; काव्य ही केवळ विनोदाच्या दृष्टीनें एकतारी होय. एकतारी वाजवूनहि भजन करितांना समाधि लागू शकेल, पण तर्फेच्या सतारीवरची विनोदाची रागदारी तिच्यावर वाजवितां येणार नाहीं. तरी पण या एकतारीवर आणि यमक व वृत्त यांची बंधनें सोसूनहि गडकऱ्यांनीं आपल्या कवितांतून विनोदाचा पिंगा घातला आहे. उदाहरणार्थ, ‘एक समस्या’ विहिणींचा कलकलाट’, ‘विचार’, “काय करावें’ ‘आंधळ्यांची माळ’ व ‘ हुकमेहुकूम’ या कविता वाचल्या असतां काव्यहि विनोदाच्या कार्याला कसें खेचून आणतां येतें हें दिसून येईल. इंग्रजीत हूड कवीची कविता एथून तेथून श्लेषयुक्त किंवा विनोदपर आहे. पण तुलना करावयाची तर गोविंदाग्रज व हूड यांची न करतां गंभीर व विनोदी अशी मिश्र कविता करणाऱ्या पोपचीच तुलना करावयास पाहिजे. पोपच्या डन्सिअड- प्रमाणे मराठी वाङ्मयांतील ‘शेखांचा बाजार’ अशा स्वरूपाचें एक काव्य गडकरी लिहिणार होते असें समजते. पण कदाचित् पोपइतका विद्वेषी गडकऱ्यांचा स्वभाव नसल्यामुळे म्हणा किंवा ‘कवींचा कारखाना’ या त्यांच्या विनोदी लेखांत या बाजाराचा थोडासा भाग दाखविला असल्यामुळें म्हणा, त्यांनी हात आखडता घेतला असावा.
पण गडकऱ्यांचे खरें कवित्व पाहावयाचे तर तें या विनोदी कवितांतून जितकें सांपडेल त्यापेक्षां त्यांच्या इतर कवितांतूनच तें अधिक सांपडेल असे मला वाटतें. त्यांच्या काव्यांतील अस्सल प्रतिभाजन्य कल्पना मग त्या गोड असोत, गंभीर असोत, भीषण असोत पाहावयाच्या तर ‘गोड निराशा’, ‘विरामचिन्हें’, ‘गुलाबी कोडें’, ‘घुबड’, ‘ भुतांचें गाणें’, ‘बागडणाऱ्या लहानग्या लाडक्यास’ व ‘ कधी’ वगेरे कविता वाचकांनी वाचून पाहाव्या. अशाच इतरहि आणखी कांही आहेत.
रसाच्या दृष्टीनें पाहतां गडक-यांचे काव्यवाणींत प्रेमळपणाहि ठिकठिकाणी दिसून येतो. ‘ प्रेमसंन्यास’ किंवा ‘पुण्यप्रभाव’ या त्यांच्या नाटकांत प्रेक्षकांस रडावयास लावणारे जे कांहीं प्रवेश आहेत त्यांच्याच तोडीच्या कांहीं कविता या कवितासंग्रहांत आढळतील. ‘राजहंस माझा निजला’ ही कविता तर लहान मुलांच्याहि तोंडीं बसली आहे; पण • ‘घुंगुरवाळा’ ‘प्रेमाचा ‘प्रळयकाळ’, ‘मुरली’, ‘अवेळीं ओरडणाऱ्या कोकिळेस’ वगैरे कवितांतून केवळ करुणरसच नव्हे पण सर्वसामान्य प्रेमळपणा येतो.
तिसराहि एक विशेष प्रकार गडक-यांच्या कवितेंत आढळतो. त्याला ‘शाहिरशाही ‘ हें नांव मला द्यावेंसें वाटतें. गडकऱ्यांचा बसरी, पोवाडे, लावण्या वगैरेंचा अभ्यास फार कसून झालेला होता. ‘सगनभाऊ’, ‘प्रभाकर’, तुळशीराम’, ‘होनाजी बाळ’ वगैरेंचा उल्लेख त्यांनी ‘महाराष्ट्र गीतां’त इतर कवींबरोबर केलेला असला तरी या चौघांच्या कवितइतकें वाचन दुसऱ्या महाराष्ट्र कवींचे त्यांचें झालें नसावें. गडकऱ्यांना जुन्या मराठी भाषेचा अलीकडे विशेष नाद लागलेला असून त्यांनी त्या भाषासंप्रदायाचें पुनरुज्जीवन करण्याचा जोराचा प्रयत्नहि चालविला होता. कांही वर्षांपूर्वी गडकऱ्यांनी आपल्या ‘राजसंन्यास’ नाटकांतील कांहीं प्रवेश मला वाचून दाखविले. त्यांत या नवीन सांप्रदायाचा त्यांचा अभ्यास इतका दिसून आला कीं, कांहीं कांहीं वाक्यें अर्थ समजण्याकरितां मला त्यांजकडून दोनदोनदां वाचवून घ्यावीं लागलीं. रंगभूमीवर हें नाटक चालू असतां प्रेक्षकांस ही भाषेची अडचण भासल्याशिवाय राहणार नाहीं, असेंहि मी त्यांना म्हटलें. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, शाहिरांच्या काव्याचा अभ्यास त्यांनी फार केला होता व प्रस्तुत कवितासंग्रहांतील ‘ प्रेम आणि मरण’, ‘मुरलि’, कुंडल’ वगैरे कवितांतून हे दिसून येते. ‘महाराष्ट्रगीत’ ही कविता अभिमानावेशानें ओथंबलेली आहे. ही कविता अर्धवट राहिलेली असून कोणा महाराष्ट्रप्रेमी कवीला पूर्वीच्या धोरणानें पुरी करण्याची बुद्धि झाल्यास महाराष्ट्रांत सभांतून वगैर म्हणण्याला तें उपयोगी पडेल.
गडकरी यांनीं आपल्या कवितांतून कांही नवीन शब्दसांप्रदाय निर्माण केलेले आहेत. उदाहरणार्थ, ‘अश्रूंची मोहनमाळ’, ‘फुलती दुनिया’, ‘गाणं झुळझुळणें’, ‘गाणे उधळणें’, ‘जिवाचा रास’, ‘जिवाची झूल’ इत्यादि. भूगर्भात ज्याप्रमाणें उष्णता व दडपण यांच्या योगानें ओबडधोबड पण सतेज हि-याचे दगड बनतात तसेच प्रतिभेची उष्णता व छंदोबद्धतेचें दडपण यांच्या योगानें काव्यांतहि शब्दहीरक बनतात. त्यांतूनहि गडकरी हे नवीन शब्दरचनेला न भिणारेच काय पण साधल्यास ती हटकून करण्याचा हव्यास धरणारे असल्यानें, त्यांच्या कवितेंत न कापलेले किंवा न घांसलेलें असें जवाहिर सर्वत्र उधळलेले आढळतें.
प्रस्तुत लेख हा प्रस्तावनारूप आहे, टीकारूप नाहीं. तथापि गडकऱ्यांच्या काव्यरचनेतील ठळक दोषहि जातां जातां सांगण्यास हरकत नाहीं. ते असे कीं, क्वचित् ठिकाणीं व्याकरणदृष्ट्या त्यांची भाषा अशुद्ध तर असतेच पण क्वचित् अव्यवस्थित रचना, कांहीं ठराविक शब्दांची व कल्पनांची पुनरुक्ति, ग्राम्य शब्दप्रयोग व उत्प्रेक्षातिरेक हेहि त्यांचे हातून घडून येतात. तसेंच कांहीं कविता बऱ्याच क्लिष्ट आहेत; व सर्वसामान्यपणे मुख्य दोष सांगावयाचा तर कल्पनांची शब्दांवर जबरी, त्यामुळे येणारी कृत्रिमता व प्रसादाभाव हा होय. या दृष्टीने रे. टिळक, ठोमरे किंवा स्वतः गडकऱ्यांनी मानलेले गुरु केशवसुत यांची दिशा व गडक-यांची दिशा या अगदी भिन्न वाटतात. इंग्रजी कवींची उपमा द्यावयाची तर गडक-यांचे काव्य वर्डस्वर्थं किंवा टेनिसन यांपेक्षां शेले किंवा ब्राउनिंग यांच्या वळणाकडेच अधिक झुकतें.
तथापि हे दोष असूनहि कवि या नात्यानें आधुनिक वाङ्मयांत गडक-यांना फार उच्च प्रतीचें स्थान मिळालें आहे यांत शंका नाहीं; व तें योग्यहि आहे. कल्पनेचे धाडस व चमत्कृति हा जर काव्याचा एक मुख्य गुण मानला तर त्या बाबतींत गडक-यांची बरोबरी करणारे कवि किती निघतील, असा प्रश्न टाकण्यास मुळींच हरकत नाहीं. त्यांच्या नाटकांच्या आधाराने व स्वतंत्रहि गोविंदाग्रजांची कविता लोकांच्या जिव्हाग्री बसून खेळती झाली आहे. आणि ज्यांच्याकडे बोट दाखवून जुन्या-नव्या कवितेचें भांडण मांडण्याला आणि आधुनिक मराठी कवितेची तरफदारी करण्याला जोर येतो अशा कवींत गडक-यांची गणना बरीच प्रामुख्यानें करितां येईल. गडकरी यांचें कविचरित्र एखाद्या धूमकेतूप्रमाणें अकल्पित व तेजस्वी होऊन गेलें. पण धूमकेतूच्या तेजापेक्षां गडक-यांची काव्यकीर्ति त्यांच्या पश्चात् अधिक काळ टिकेल यांत शंका नाहीं. ‘नवकवितेच्या जरिपटक्याचा तुलाच अधिकार’ अशा शब्दांनी गडक-यांनी बालकवि ठोमरे यांना आपल्या काव्यांत भूषविलें आहे. उदार बुद्धीचें हें देणें इतर कविहि कांही काल गोविंदाग्रजांस देऊ इच्छितील असें मला वाटतें. कारण सुदैवानें सरस्वतीच्या जरिपटक्याच्या मानांत तरी वतनदारी होऊं शकत नाही.
पुणें, ता. १३ माहे ऑगस्ट सन १९२१
न. चिं. केळकर.